अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरु आहे. युद्धाचा आजचा सोळावा दिवस आहे. या संघर्षाचा परिणाम आता जागतिक बाजारपेठेवर दिसू लागला आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर या प्रदेशात तणाव प्रचंड वाढला असून गेल्या तीन आठवड्यांपासून दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष सुरू आहे. या युद्धाचा परिणाम केवळ राजकीय किंवा लष्करी पातळीवरच मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचे पडसाद दैनंदिन वापरातील वस्तूंवरही उमटू लागले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कंडोमचे दर.
:max_bytes(150000):strip_icc()/VWH-GettyImages-1212960574-b8c09843d6c94ca8ae287f1ba6a9eee1.jpg)
उद्योग क्षेत्रातील माहितीनुसार, कंडोम तयार करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सिलिकॉन ऑइल, पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे साहित्य तसेच अॅल्युमिनियम लॅमिनेट या वस्तूंच्या आयातीत अडथळे निर्माण झाले आहेत. आखाती भागातील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्यामुळे कच्च्या मालाच्या किंमती ४० ते ४५ टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे.

याचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर झाला आहे. उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी सुमारे १८० रुपयांना उपलब्ध असलेले एक महत्त्वाचे केमिकल आता सुमारे २७० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून येत्या काळात किरकोळ बाजारात कंडोमच्या पॅकेटच्या किंमतीत १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर हे देशातील कंडोम उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. येथे रेमंड लाईफस्टाइल, सेफगार्ड आणि युनिव्हर्सल अशा कंपन्या कार्यरत असून या कंपन्या मिळून दरवर्षी १०० कोटींपेक्षा जास्त कंडोमचे उत्पादन करतात. येथे तयार होणाऱ्या कंडोमचा पुरवठा केवळ भारतातच नाही तर नेपाळ, आफ्रिकेतील काही देश तसेच इतर अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही केला जातो.
मात्र सध्या कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे या उद्योगावर दबाव वाढत असल्याचे दिसत आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे कंपन्यांना किंमत वाढवण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असे उद्योग क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
![]()
गेल्या काही काळात पेट्रोल, गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सामान्य नागरिक आधीच त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत आता कंडोमसारख्या उत्पादनाच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो.

उद्योग संघटनांनी या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडे कच्च्या मालाच्या आयात प्रक्रियेत सवलत देण्याची तसेच पर्यायी पुरवठा मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेवर किती व्यापक परिणाम होऊ शकतो, याचे हे आणखी एक उदाहरण मानले जात आहे.



