वाघ्या–मुरळी परंपरेच्या लोकसंस्कृतीवर आधारित एका स्त्रीच्या आयुष्याची कहाणी लवकरच ‘फुला’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना अस्सल लोकसंगीताचा आनंद मिळणार असून बर्याच दिवसांनंतर मराठी सिनेमात सात गाण्यांचा समृद्ध आणि सुरेल अल्बम ऐकायला मिळणार आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील काही नव्या कल्पना घेऊन काम करणाऱ्या तरुणांनी एकत्र येत हा चित्रपट साकारला आहे. पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी ‘फुला’ची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांच्या वतीने चित्रपट सादर केला जात आहे. चित्रपटाची कथा अभिषेक जावीर यांनी लिहिली असून दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. तर पटकथा रवी किरण जावीर यांनी लिहिली आहे.
‘फुला’ ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीच्या संघर्षाची भावनिक कथा आहे. तमाशा फड, जागरण-गोंधळ यांसारख्या पारंपरिक सांस्कृतिक पार्श्वभूमीवर ही गोष्ट उभी राहत असून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे दर्शन यात घडते. चित्रपटात कान्हा तुझी बासरी, माझा राजा मल्हारी, आसरा तू माझ्या जीवाचा, कुंकू कोरलं कपाळी, मुरळी झाले मी गं बाई, कपाळी सजलं बाशिंग आणि डर्बीचा थरार अशी सात गाणी आहेत. कथानकानुसार येणाऱ्या या गीतांमधून वाघ्या–मुरळी परंपरेचे विविध पैलू आणि मुरळीच्या भावना प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत.
अस्सल लोकसंस्कृती, भावपूर्ण कथा आणि सुरेल गाण्यांनी सजलेला ‘फुला’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. हा चित्रपट 17 एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.






