पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आर्वी गावात एका २५ वर्षीय विवाहितेची ओढणीने गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत महिलेचे नाव रुतुजा अक्षय तावरे असे असून आरोपी पतीचे नाव अक्षय रामदास तावरे आहे. रुतुजा आणि अक्षय यांचा विवाह १६ मे २०२५ रोजी झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांतच दोघांमध्ये घरगुती कारणांवरून वाद सुरू झाले. वाद वाढत गेल्याने रुतुजाला वारंवार मारहाण होत असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.
मारहाणीला कंटाळून रुतुजा काही महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली होती. त्यानंतर हे प्रकरण महिला आयोगापर्यंत पोहोचले. दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत समेट घडवून आणण्यात आला आणि रुतुजा पुन्हा पतीसोबत राहण्यासाठी सासरी गेली. मात्र, काही दिवसांनंतर पुन्हा वाद सुरू झाले.
४ मे २०२६ रोजी रुतुजाचा भाऊ अनिकेत पवार याने तिला सासवड येथे सोडले. त्यानंतर आरोपी अक्षय तिला आर्वी गावात घेऊन गेला. तेथे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर अक्षयने ओढणीने गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मंगळवारी दुपारी रुतुजाच्या नातेवाईकांना तिच्या मृत्यूची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुतुजाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या प्रकरणी रुतुजाचा भाऊ अनिकेत पवार यांनी खेड-शिवापूर पोलीस चौकीत तक्रार दिली असून, राजगड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ आणि ८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पती अक्षय तावरे सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
संसार वाचवण्यासाठी पुन्हा एकदा सासरी गेलेल्या रुतुजाचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राजगड पोलीस करत आहेत.

