सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय राजाराम राऊत या 26 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. आपल्या पत्नीसह तिच्या प्रियकराच्या सततच्या जाचाला कंटाळून एका नवविवाहित तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या तरुणाचे लग्न अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच झालं होतं. लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यात तरुणाने अशाप्रकारे आयुष्य संपवल्याने मोहोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील यावली येथील रहिवासी असलेल्या संजय राजाराम राऊत (वय २६ वर्ष) याचं दोन महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र लग्न होताच पत्नीचं आधीपासूनच एका दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम असल्याची माहिती संजयला मिळाली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. मात्र संजयची पत्नी आणि तिचा प्रियकर सौरभ सदाशिव शिंदे (रा. कोडी, ता. उत्तर सोलापूर) यांनी संजयला त्रास द्यायला सुरुवात केली.
कोणते संजय राऊत?
या दोघांच्या प्रेमसंबंधांमुळे संजयचं वैवाहिक जीवन बरबाद झालं. त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर सौरभ हे दोघेही मिळून संजयाला सतत शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचा गंभीर आरोप मृताच्या वडिलांनी केला आहे. या सततच्या जाचाला कंटाळून आणि समाजातील अपमान सहन न झाल्याने संजयने शुक्रवार, दिनांक १० जुलै रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
दरम्यान, ठाकरे सेनेचे खासदार संजय राजाराम राऊत आणि या घटनेतील संजय राजाराम राऊत हे नाम सेमच आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांना राजकीय नेते आणि महाराष्ट्रात सौ दाऊद की एक राऊत की असे प्रसिद्ध असलेले ठाकरे सेनेचे संजय राऊत यांनी आत्महत्या केली की काय? असं हेडलाईन वाचून वाटलं आहे. पण दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. खासदार संजय राऊत सध्या एकदम ठणठणीत आहेत.
कोण शिंदे?
संजयच्या मृत्यूमुळे राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी मयत संजय राऊतचे वडील राजाराम नागनाथ राऊत यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे. आपल्या फिर्यादीत त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, त्यांच्या मुलाने पत्नीसह तिच्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. वडिलांच्या फिर्यादीवरून मोहोळ पोलिसांनी संजयची पत्नी आणि प्रियकर सौरभ शिंदे या दोघांच्या विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.


