बारामतीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाच्या जिल्हा परिषद सदस्यावर तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.
पुणे जिल्हा परिषदेत दोन दिवसांपूर्वी एका तरुणीने केलेल्या आत्मदहनाच्या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
20 वर्षांपासून लग्नाचे आमिष, वारंवार बलात्कार
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश जगताप यांनी गेल्या २० वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून आपली फसवणूक केली आणि वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला आहे. या त्रासाला कंटाळून दोन दिवसांपूर्वी पीडितेने पुणे जिल्हा परिषदेच्या बैठकीदरम्यान थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे जिल्हा परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.
पुण्यातून बारामतीत गुन्हा वर्ग
आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर पीडित तरुणीने तात्काळ पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. याप्रकरणी सुरुवातीला पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घटनेचे गांभीर्य आणि कार्यक्षेत्र विचारात घेऊन हा गुन्हा पुढील तपासासाठी बारामतीतील माळेगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सध्या माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
राजकीय वर्तुळात खळबळ
पुणे जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. त्यातच थेट सत्ताधारी पक्षातील आणि बारामती तालुक्यातील सक्रिय जिल्हा परिषद सदस्यावरच बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मंगेश जगताप यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विरोधकांकडून या प्रकरणावरून जोरदार टीका करण्यात येत आहे.




