---Advertisement---

“तुझी पोरगी माझ्याकडे पाठव 10 हजार देतो”, पोलिसाची महिलेकडे अश्लील मागणी

April 1, 2026 5:42 PM
---Advertisement---

नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलीस दलावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना अकोला शहरात उघडकीस आली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या एका आरोपी महिलेकडे कर्तव्यावरील सहायक पोलीस उपनिरीक्षकाने (ASI) अश्लील मागणी केली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय घडला प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका महिलेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानुसार तिला अकोला येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. याच दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या एएसआय राजेश जाधव याने रात्रीच्या सुमारास त्या महिलेकडे ‘तुझ्या मुलीला शरीरसुखासाठी पाठव, १० हजार रुपये देतो’ अशी संतापजनक व अश्लील मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे पीडित महिला हादरली असून तिने तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.

वरिष्ठांनी झापले…

घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित एएसआयला खडेबोल सुनावले. “वर्दी घातली आहेस ना… असे कृत्य करताना तुला लाज वाटली नाही का?” अशा कठोर शब्दांत त्याचा समाचार घेण्यात आला. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून त्यात वरिष्ठांचा संताप स्पष्टपणे दिसून येत आहे.

दरम्यान, संबंधित एएसआय राजेश जाधव याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस कोठडीसारख्या ठिकाणीही महिलांची सुरक्षा धोक्यात आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून अकोल्यासह राज्यभर या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment