---Advertisement---

बारामती पोटनिवडणूक : भाजप उमेदवार देणार नाही, फडणवीसांची घोषणा

March 19, 2026 12:20 PM
---Advertisement---

राज्यातील महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांनंतर आता राजकीय वर्तुळाचे लक्ष बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच येथे पोटनिवडणुका जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. या दोन्ही जागांवरील निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आमची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

राहुरी येथे आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३९ वा पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. या सन्मानानंतर देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉ. देवेंद्र फडणवीस’ म्हणून संबोधले जाणार आहे. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

फडणवीसांचे विधान
बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांतील निवडणुका शक्यतो बिनविरोध व्हाव्यात, यासाठी सर्व पक्षांनी एकमताने निर्णय घ्यावा, असा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मात्र, जर निवडणूक लढवावी लागलीच तर आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्यास तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असून त्यात पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याच परिषदेत महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीबाबतही घोषणा होऊ शकते.

बारामतीत सुनेत्रा पवारांचा उमेदवारीचा निर्णय
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघातून सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना विधिमंडळाचे सदस्य होणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीने त्यांच्या उमेदवारीला आधीच मंजुरी दिली आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा उल्लेख करत ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

राहुरीत कर्डिले यांच्या वारसदाराकडे लक्ष
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निधन झाले होते. त्यामुळे या जागेसाठी भाजप कर्डिले कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देणार की एखादा नवा चेहरा मैदानात उतरवणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment