---Advertisement---

वालचंदनगरमध्ये आंतरजिल्हा चोरी टोळीचा पर्दाफाश

April 14, 2026 11:14 PM
---Advertisement---

वालचंदनगर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालत पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वालचंदनगर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीत सहा गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे महेश उर्फ मावड्या मंगेश काळे (वय २४, रा. बाभुळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) आणि पंकज गुरुपत पवार (वय २४, रा. मांगी, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी आहेत. गेल्या काही दिवसांत पुणे ग्रामीण हद्दीत वाहन चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, पोलिस पथक गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे इंदापूर-बारामती मार्गावरून संशयित येत असल्याचे समजले. त्यानुसार गोतोंडी (ता. इंदापूर) येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. पुढील चौकशीत त्यांनी वालचंदनगर, जेजुरी, दौंड आणि करमाळा परिसरात चोरी केल्याची कबुली दिली.

या कारवाईत पोलिसांनी एकूण ३ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात पाच मोटारसायकली (३ लाख ८ हजार रुपये) आणि जबरी चोरीतील सुमारे ३ ग्रॅम सोन्याचे दागिने (४८ हजार रुपये) यांचा समावेश आहे. या अटकेमुळे वालचंदनगरमधील ३, जेजुरी, दौंड आणि करमाळा येथील प्रत्येकी १ असे एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सपोनि राजकुमार डूणगे, सपोनि कुलदीप संकपाळ आणि त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी ही कामगिरी यशस्वी केली.

सध्या दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.

Omkar Wagh

ओंकार वाघ, महाराष्ट्र टाइम्समध्ये डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत होते. त्यांनी २०१९ पासून पत्रकारीतेला सुरुवात केली. त्यांना डिजीटल मीडियामध्ये 6 वर्षाचा अनुभव आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment