---Advertisement---

भिगवण परिसरातील बळीराजा ढाब्यासमोर विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू; दोघांविरुद्ध गुन्हा

March 14, 2026 2:53 PM
---Advertisement---

इंदापूर तालुक्यातील भादलवाडी हद्दीत बळीराजा ढाब्यासमोर अनधिकृतपणे विजेचा वापर करताना घडलेल्या प्रकारात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ मच्छिंद्र कसबे (वय 26, रा. मदनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ रोहित मच्छिंद्र कसबे (वय 28, व्यवसाय – चालक, रा. मदनवाडी-चौफुला, भिगवण) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास भादलवाडी गावाच्या हद्दीत बळीराजा ढाब्यासमोर हा प्रकार घडला. ढाब्याच्या नावाचा लोखंडी बोर्ड बसवण्याचे काम सुरू असताना आरोपी संतोष उर्फ मुकेश पवार (रा. मदनवाडी, ता. इंदापूर) आणि ढाबा मालक सागर खाडे (पूर्ण पत्ता अज्ञात) यांनी एमएसईबीच्या विद्युत खांबावर अनधिकृतपणे वायरचा आकडा टाकून विजेचा वापर केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

यावेळी आरोपींनी सौरभ कसबे यांना त्या खांबावरील वायरचा आकडा काढण्यास सांगितले. सौरभ यांनी मला ते काम येत नाही असे सांगून नकार दिला. मात्र, आरोपींनी “तू फक्त वायर धरून हलव, आकडा खाली पडेल” असे सांगून त्यांना वायर हाताळण्यास प्रवृत्त केले. सौरभ यांनी वायर उजव्या हाताने हलवित असताना त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला. यात त्यांच्या उजव्या हाताच्या बोटांना, छातीला व पाठीला गंभीर भाजल्या जाऊन ते गंभीर जखमी झाले.

जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी पुणे येथील सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, कसबा पेठ येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दिनांक 5 मार्च रोजी रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, उपचारासाठी झालेल्या खर्चाबाबत आरोपींकडे पैसे मागितल्यावर आरोपी संतोष उर्फ मुकेश पवार यांनी फिर्यादी रोहित कसबे व त्यांची बहीण आरती यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “तुम्हाला जे करायचे ते करा” असे म्हणत बहिणीला धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 57/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106(1), 351(2), 352 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वारंगड करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment