जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत बेपत्ता झालेल्या तरुणाच्या हत्येचा उलगडा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पती-पत्नीने मिळून तरुणाचा खून केल्याचा आरोप समोर आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वरसाडे तांडा येथील विजय भिमा राठोड (वय २५) हा २४ फेब्रुवारीच्या रात्री घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता झाला होता. त्याचा शोध लागत नसल्याने त्याचा भाऊ संजय राठोड यांनी २६ फेब्रुवारी रोजी पोलिसांकडे हरवल्याची तक्रार नोंदवली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संजय परशुराम जाधव या व्यक्तीची चौकशी केली. सुरुवातीला त्याने पोलिसांना दिशाभूल करणारी उत्तरे दिली. मात्र सखोल चौकशीत त्याने पत्नी सोनाली जाधव हिचे विजय राठोड याच्याशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करत दोघांनी मिळून त्याचा खून केल्याची कबुली दिली.
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ काढून धमकावण्याच्या कारणावरून हा वाद वाढत गेला आणि त्यातूनच विजय राठोडचा खून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, खून नेमका कसा करण्यात आला आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली याबाबत आरोपी पती-पत्नींकडून पोलिसांना वेगवेगळ्या माहिती दिल्या जात आहेत. कधी गळा आवळून हत्या केल्याचे, तर कधी हात-पाय बांधून मारहाण केल्याचे किंवा लोखंडी वस्तूने वार केल्याचे ते सांगत आहेत. मृतदेहाबाबतही त्यांनी वेगवेगळे दावे केले असून कधी तो जाळल्याचे, कधी जंगलात टाकल्याचे तर कधी जाळल्यानंतर राख फेकल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संजय जाधव आणि सोनाली जाधव या दोघांना अटक केली असून त्यांना पाचोरा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करत आहेत.






