शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. याबाबतची खरी माहिती समोर आली आहे.
काय आहे सत्य माहिती?
महाराष्ट्रातील बळीराजासाठी राज्य सरकारने सुरू केलेली ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान’ योजनेच्या धर्तीवर सुरू झालेल्या या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक एकूण १२,००० रुपयांची आर्थिक मदत मिळते. सध्या राज्यातील लाखो शेतकरी ८व्या हप्त्याच्या (₹२,०००) प्रतीक्षेत असून, त्याबाबतची ताजी माहिती समोर आली आहे. या योजनेच्या निधीचा जीआर काढण्यात आला आहे.
शासन निर्णय जारी
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचा (माहे ऑगस्ट २०२५ ते नोव्हेंबर २०२५) लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रू. १७७४.०० कोटी (रुपये एक हजार सातशे चौऱ्याहत्तर कोटी फक्त) इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असं जीआरमध्ये म्हटलं आहे.
कधी मिळणार 2000 रुपये?
आता जीआर काढण्यात आला आहे. मान्य करण्यात आलेला निधी लवकरच संबंधीत खात्याकडे वर्ग केला जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पैसे वितरीत केले जाणार आहेत. अद्याप याची तारीख समोर आलेली नाही. पण लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत, हे निश्चित झालं आहे. आज 16 मार्च 2026 रोजी कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागामार्फत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.






