UIDAI Recruitment | नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अंतर्गत आधार सुपरवायझर आणि ऑपरेटर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 419 रिक्त पदे भरली जाणार असून, पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
आधार सुपरवायझर आणि ऑपरेटर पदांसाठी भरती :
यूआयडीएआय (UIDAI) अंतर्गत आधार सुपरवायझर आणि ऑपरेटर पदांसाठी 2026 च्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीद्वारे देशभरातील विविध राज्यांमध्ये एकूण 419 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती कॉमन सर्व्हिस सेंटर (Common Service Centre) मार्फत राबवली जात असून, ही संस्था इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत कार्यरत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र असल्यामुळे उमेदवारांनी आपल्या राज्याची अधिकृत अधिसूचना तपासूनच अर्ज करावा.
राज्यानुसार रिक्त जागांमध्ये सर्वाधिक 161 पदे कर्नाटक राज्यासाठी आहेत. त्यानंतर बिहारमध्ये 109, उत्तर प्रदेशमध्ये 29, पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) 25, छत्तीसगडमध्ये 18, झारखंड आणि उत्तराखंड (Uttarakhand) येथे प्रत्येकी 12 जागा उपलब्ध आहेत. याशिवाय मध्य प्रदेश (Madhya Pradesh), गोवा (Goa), गुजरात (Gujarat), आसाम (Assam), सिक्कीम (Sikkim), नागालँड (Nagaland), अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh), जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) तसेच त्रिपुरा (Tripura) या राज्यांमध्येही विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.
UIDAI Recruitment | पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच 10 वी उत्तीर्ण उमेदवारांनी दोन वर्षांचा आयटीआय (ITI) अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा किंवा 10 वी नंतर तीन वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा (Polytechnic Diploma) केलेला असावा. याशिवाय उमेदवारांकडे यूआयडीएआयने अधिकृत केलेल्या संस्थेकडून जारी करण्यात आलेले वैध आधार सुपरवायझर किंवा ऑपरेटर प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणेही आवश्यक आहे.
अर्जदारांचे किमान वय 18 वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा संबंधित राज्याच्या अधिकृत अधिसूचनेनुसार निश्चित करण्यात आली आहे. नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी यूआयडीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावरील भरती लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज भरावा. अर्जामध्ये सर्व माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावी. लागू असल्यास अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे.
तसेच अर्ज अंतिम सादर केल्यानंतर त्याची प्रिंट किंवा पीडीएफ प्रत भविष्यातील वापरासाठी जतन करून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी संबंधित राज्याची अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे, कारण अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
