भिगवण नजीक असणाऱ्या तक्रारवाडी गावाला लाभलेलं वैभव म्हणजे भिमा नदी आणि डोंगर भागातील नयनरम्य निसर्ग. पण आज याच निसर्गाची दुर्दशा होताना पाहायला मिळत आहे. दुर्देवाची बाब म्हणजे याकडे वनविभाग लक्ष देताना तसेच उपाययोजना करताना दिसत नाही.

ठिकठिकाणी कचरा
तक्रारवाडी आणि मदनवाडी गावांच्या हद्दीमध्ये येणाऱ्या वनक्षेत्रात बेकायदेशीर वृक्षतोड होत आहे. येथील काही लोक चुलीसाठी सरपण म्हणून वृक्षांची कत्तल करत आहेत. यामुळे दिवसेंदिवस येथील वृक्षांची संख्या कमी होत चालली असून डोंगर उजाड होत चालला आहे. याशिवाय येथे ठिकठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाणही वाढत असून घाणीचे साम्राज्य विस्तारत आहे. या कचऱ्यांना अनेकदा आगही लावली जाते. यामुळे वनक्षेत्राला धोका निर्माण होऊ शकतो.

वनविभाग कार्यालयाच्या जवळच पार्ट्या
दुर्देवी बाब म्हणजे वनक्षेत्रात असणाऱ्या वनविभागाच्या नवीन कार्यालयाच्या अवघ्या 100 ते 150 मीटर अंतरावरदेखील काही गावकऱ्यांकडून कचरा टाकला जातो. शिवाय आजूबाजूच्या परिसरातून आणलेला बांधकामाचा ढिगारादेखील इथे टाकला जातो. पण यावर वनविभागाचे अधिकारी कारवाई करताना दिसत नाहीत. याव्यतिरिक्त हुल्लडबाज मंडळी वनक्षेत्रात बेकायदेशीर चिकन, मटण पार्ट्या करण्यासाठी येतात.

तळीरामांचा सुळसुळाट
इथे तळीराम आणि जुगारबाजांमुळे ठिकठिकाणी दारुच्या बाटल्या आणि पत्ते पाहायला मिळतात. यामुळे वनक्षेत्र विद्रुप होत चालले अशून वनक्षेत्राचे रक्षण करण्यासाठी कुणी वाली आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी. गावकऱ्यांना योग्य त्या सूचना कराव्यात. शिवाय इथे वृक्षलागवडही करावी, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.










