पश्चिम बंगालमधील कोलकाता महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 109 च्या तृणमूल काँग्रेसच्या नगरसेविका अनन्या बॅनर्जी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मात्र यावेळी त्यामागे राजकीय वक्तव्य किंवा विकासकाम नसून त्यांच्या कार्यालयातून सापडलेल्या काही आक्षेपार्ह वस्तूंमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
मुकुंदपूर परिसरातील कार्यालयात सोमवारी काही कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक दाखल झाले असता त्यांना कार्यालयात कंडोमची पाकिटे, मसाज मशीन, रोकड आणि इतर काही वस्तू आढळल्याचा दावा करण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून कार्यालयाचा वापर नेमका कोणत्या कामासाठी केला जात होता, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याचवेळी कार्यालयातून एक पिवळ्या रंगाची नोंदवहीही जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आंदोलकांच्या मते, या वहीत कथित भरती घोटाळ्याशी संबंधित नावे आणि व्यवहारांची माहिती असू शकते. सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
वाद वाढल्यानंतर नगरसेविका अनन्या बॅनर्जी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, संबंधित कार्यालयाच्या चाव्या त्यांच्या ताब्यात नव्हत्या. तसेच कार्यालयात सापडलेल्या काही वस्तू ईदच्या निमित्ताने दान करण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र कंडोम आणि मसाज मशीन यांसारख्या वस्तूंविषयी त्यांनी स्पष्ट भाष्य केले नाही.
अनन्या बॅनर्जी यांनी 8 जूनपासून त्या कार्यालयात गेल्या नसल्याचाही दावा केला आहे. त्यामुळे कार्यालयात सापडलेल्या वस्तू नेमक्या कोणी ठेवल्या आणि त्यांचा उद्देश काय होता, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. तपासानंतरच संपूर्ण सत्य समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे बंगालच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.


