बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकाच्या विरोधात विनयभंगाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवकाने एका विधवा महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना बारामतीत घडली आहे. नको तसले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडे शरिरसुखाची मागणी केली असं तक्रारीत म्हटलंय.
कोण आहे तो?
या प्रकरणामुळे बारामती हादरली आहे. दादांच्या राष्ट्रवादीचं नाव खराब झालं आहे. किशोर आप्पासाहेब मासाळ असं गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. तो नगरसेवक आता पुरता अडकला आहे. सत्तेपोटी हे चुकीचे कृत्य केल्याची चर्चा सुरु झालीय.
घरात घुसून महिलेवर जबरदस्ती
विधवा महिलेचा छळ करून पीडित महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिचा विनयभंग करणे, मारहाण करणे,तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणे, याशिवाय संबंधित महिलेला उद्योजकांकडून खंडणी वसूल करायला लावण्यासाठी तिच्यावरती दबाव टाकेन, असे विविध आरोप किशोर मासाळ यांच्यावरती करण्यात आलेत. बारामती तालुका पोलीस ठाण्यात संबंधित पीडितेच्या तक्रारीवरून किशोर मासाळ याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असहाय्य असल्याचा गैरफायदा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी २०२६ ते २५ मे २०२६ या कालावधीत हा प्रकार घडलाय. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले असल्याने ती विधवा आणि असहाय्य असल्याचा गैरफायदा आरोपीने घेतला. ओळख असल्याचा फायदा घेऊन आरोपीने वेळोवेळी महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. तिथे त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला.
आरोपीने पीडित महिलेला धमकावत, “तू बारामती येथील उद्योजकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून मला पैसे काढून दे, नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करीन,” अशी धक्कादायक धमकी दिली. या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून पीडितेने बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात किशोर आप्पासाहेब मासाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादांची लाडकी बहिण…
अजित पवारांच्या काळात लाडकी बहिण योजना सुरु झाली. महाराष्ट्रातील तमाम पात्र महिलांना 1500 दरमहिना सुरु करण्यात आलं. महिलांच्या आर्थिक मजबुतीसाठी ही योजना सुरु करण्यात आली. दादा नेहमी म्हणायचे हा दादाचा वादा हाय. पण आता त्याच दादांच्या लाडक्या बहिणीवर किशोर मासाळसारख्या लिंगपिसाटांची नजर पडली आणि लाडक्या बहिणींचे लचके तोडण्याची वृत्ती समोर आली, अशी विरोधकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. यावरून विरोधक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत.
सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार?
अजित दादा आता हयात नाहीत. त्यांच्या पाठिमागे त्यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार अजित पवार गटाची धुरा सांभाळत आहेत. त्यामुळे या आरोपांनंतर सुनेत्रा पवार नगरसेवक किशोर मासाळवर काय कारवाई करणार का? याकडे लक्ष लागले आहे.






