इंदापूर, दि. 12 जून : इंदापूर तालुक्यातील तब्बल 81 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत गुरुवारी पार पडली. या सोडतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक गावांमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या आरक्षणाचीही घोषणा करण्यात आली असून, आरक्षण जाहीर होताच गावातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
जाहीर झालेल्या आरक्षणानुसार वॉर्ड क्रमांक 1 मध्ये अनुसूचित जाती (SC) महिला, सर्वसाधारण महिला तसेच सर्वसाधारण महिला/पुरुष यासाठी जागा राखीव आहेत. वॉर्ड क्रमांक 2 मध्ये इतर मागास प्रवर्ग (OBC) महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण महिला/पुरुष यासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये OBC पुरुष, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण महिला/पुरुष यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर संभाव्य उमेदवार, विद्यमान पदाधिकारी आणि विविध राजकीय गटांकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असून, निवडणुकीच्या रणनीती आखल्या जात आहेत. काही ठिकाणी उमेदवारीसाठी चाचपणी सुरू झाली असून, इच्छुकांकडून मतदारांशी संपर्क वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ग्रामपंचायत ही गावच्या विकासाचा केंद्रबिंदू मानली जात असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पाणीपुरवठा, रस्ते, रस्ते, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व निवडण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात तक्रारवाडीतील राजकीय वातावरण आणखी रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आरक्षणामुळे काही इच्छुकांच्या आशा मावळल्या असल्या तरी नव्या चेहऱ्यांना संधी उपलब्ध झाल्याने गावातील राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली तरी तक्रारवाडीमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

