भिगवण: परिसरात खुलेआम कचरा जाळण्याच्या घटना वाढत असून पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. आठवडे बाजार परिसरात एका भंगार व्यावसायिकाकडून वारंवार कचरा जाळला जात असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात काळा धूर पसरत आहे. या धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, घशात खवखव तसेच तीव्र दुर्गंधीचा त्रास सहन करावा
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना या प्रदूषणाचा अधिक फटका बसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कचरा जाळणे हे पर्यावरणीय नियमांचे स्पष्ट उल्लंघन असूनही संबंधित भंगार व्यावसायिकाकडून हा प्रकार सुरूच असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे परिसरातील हवा प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन कचरा जाळण्याच्या प्रकारांना आळा घालावा व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.






