इंदापूर तालुक्यातील पिंपळे गावात सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पावरून सध्या वाद निर्माण झाला असून, या प्रकरणाने स्थानिक पातळीवर चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. या प्रकल्पासाठी सौर ऊर्जा वाहिनी टाकताना प्रशासनाकडून शेतकऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. हा प्रकल्प AVADA कंपनीमार्फत राबवला जात असल्याची माहिती समोर आली असून, प्रकल्पाच्या अंमलबजावणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शेतकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून, शेतामध्ये पोल उभारण्यास त्यांचा कोणताही विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र हा प्रकल्प शासनाचा असल्याचे अधिकृत कागदपत्रे दाखवावीत, तसेच जमीन वापराबाबत स्पष्ट माहिती द्यावी, त्यानंतरच कामास सहकार्य करू, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. काही शेतकऱ्यांनी योग्य मोबदला, लेखी परवानगी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय काम होऊ देणार नाही, असा इशाराही दिला आहे.
दरम्यान, शिखर शिंगणापूर यात्रेसाठी गावातील अनेक शेतकरी बाहेर गेले असताना प्रशासनाने त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत, कोणतीही पूर्वसूचना न देता गुपचूप शेतातून वाहिनी टाकण्याचे काम केल्याचा गंभीर आरोपही शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाविरोधात नाराजी तीव्र होताना दिसत आहे.
या संपूर्ण प्रकरणात पारदर्शकतेचा अभाव असल्याची भावना व्यक्त होत असून, स्थानिक नागरिक आणि शेतकरी यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या काळात आंदोलन उभारण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.






