---Advertisement---

सेवापूर्ती निमित्त सैनिकाचा ग्रामस्थांकडून भव्य सत्कार

April 10, 2026 5:01 PM
---Advertisement---

माळशिरस (ता. पुरंदर, जि. पुणे) – भारतीय लष्करातील मराठा बटालियनमध्ये तब्बल वीस वर्षे उल्लेखनीय देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या श्री. नवनाथ मारुती यादव यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ नुकताच माळशिरस येथे उत्साहात पार पडला. माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने सूर्या लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात स्नेहभोजनासह त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी नवनाथ यादव यांच्यासह त्यांच्या पत्नीचाही सन्मान करण्यात आला. तसेच आपल्या एकुलत्या एक मुलाला देशसेवेसाठी लष्करात पाठवणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांचा विशेष गौरव करण्यात येऊन उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली. नवनाथ यादव यांनी 2006 साली यवत येथील विद्या विकास मंदिर येथे शिक्षण घेत असताना आपल्या मामांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय लष्करात प्रवेश केला. त्यांच्या कारकिर्दीत कर्नाटक, गुजरात (जामनगर), उत्तर प्रदेश (कानपूर), सियाचिन ग्लेशियर, जम्मू-काश्मीर, पंजाब (पठाणकोट), सिक्कीम, मध्य प्रदेश, कुपवाडा, बेळगाव अशा देशातील विविध संवेदनशील व दुर्गम भागांत त्यांनी सेवा बजावली. आपल्या कर्तव्यनिष्ठा, शौर्य आणि समर्पणातून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी श्री. मयूर यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. गंगाराम जगदाळे, विद्यमान जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्राजक्ता दुर्गाडे, सरपंच सौ. आरती यादव (माळशिरस), अजय इंगळे जिल्हा परिषद सदस्य पुणे, समीर दोरगे (सरपंच, यवत), माऊली यादव (पंचायत समिती, पुरंदर), अविनाश कुदळे सदस्य जिल्हा परिषद पुणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच विद्या विकास मंदिर, यवत येथील त्यांच्या मित्रपरिवारातील संतोष राजगुरू, दीपक शेळके, बापू शेळके, अण्णा दोरगे, सचिन दोरगे, महेश पाटील, आशा बोरावके, संगीता दोरगे, वर्षा लकडे, मनीषा रायकर आदींनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मित्राचा गौरव केला.

माळशिरस ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर यादव यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेश यादव यांनी केले. या सोहळ्याने गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली असून, सैनिकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment