नोकरीची सुवर्णसंधी! पीएमपीएमएलमध्ये 4 हजार चालक-वाहकांची मेगाभरती; पुणे-पिंपरी चिंचवडमधील तरुणांसाठी मोठी खुशखबर
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) आपल्या ताफ्यात तब्बल 1,500 नवीन बसगाड्यांचा समावेश करणार असून, या बससेवेच्या संचालनासाठी 4 हजार चालक आणि वाहकांची कंत्राटी पद्धतीने मेगाभरती केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या भरती प्रक्रियेत 2 हजार चालक आणि 2 हजार वाहकांची पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील हजारो तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांचा झपाट्याने विस्तार होत असल्याने सार्वजनिक वाहतुकीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक मार्गांवर बसगाड्यांची संख्या अपुरी पडत असल्यामुळे पीएमपीएमएलने चालू वर्षात 1,500 नवीन बस खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
नवीन बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर त्यांच्या सुरळीत आणि नियमित संचालनासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज निर्माण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर 4 हजार चालक-वाहकांच्या भरतीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. भरतीसाठी आवश्यक निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी एजन्सी निवडण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. एजन्सीची निवड होताच प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.
पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी सांगितले की, पुणेकरांना अधिक चांगली, सुरक्षित आणि वेळेवर सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन बस ताफ्यात समाविष्ट करण्यात येत आहेत. या बसचे प्रभावी संचालन करण्यासाठी चालक आणि वाहकांची संख्या वाढविणे अत्यावश्यक असल्याने ही मेगाभरती करण्यात येत आहे.
या भरतीमुळे बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे.
