---Advertisement---

राज्यातील राजकारण तापणार? बारामती-राहुरी पोटनिवडणुकीवर फडणवीसांचे वक्तव्य

March 15, 2026 8:48 AM
---Advertisement---

राज्यातील अलीकडील निवडणुकांनंतर आता राजकीय वर्तुळाचे लक्ष बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या संभाव्य पोटनिवडणुकांकडे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या असून, लवकरच येथे पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित ३९ व्या पदवीदान समारंभात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “डॉक्टर ऑफ सायन्स” ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. या सन्मानानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या दोन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणुका शक्य असल्यास बिनविरोध व्हाव्यात, अशी आमची भूमिका आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकमताने निर्णय घ्यावा, असा प्रयत्न केला जाईल. मात्र जर निवडणूक लढवण्याची वेळ आली, तर आमचा पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेत पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन जागांच्या पोटनिवडणुकीबाबतही घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

बारामती मतदारसंघाबाबतही राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे आले असून त्या येथून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पदभार स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधिमंडळाचे सदस्य होणे आवश्यक असल्याने त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानेही त्यांच्या नावाला मान्यता दिल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनीही महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा उल्लेख करत बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे या मतदारसंघातील पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Omkar Wagh

ओंकार वाघ, महाराष्ट्र टाइम्समध्ये डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत होते. त्यांनी २०१९ पासून पत्रकारीतेला सुरुवात केली. त्यांना डिजीटल मीडियामध्ये 6 वर्षाचा अनुभव आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment