---Advertisement---

डसऱ्याकने काळाची गरज ओळखली, खरात सरांच्या पुण्यतिथीनिमत्त वृक्षारोपण

May 26, 2026 12:59 AM
---Advertisement---

फलटण तालुक्यातील ताथवडे गावामध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. डसऱ्याक रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) यांच्या वतीने कै. ॲड. धोंडीराम अर्जुना खरात सर (निवृत्त प्राचार्य) यांच्या ६ व्या पुण्यतिथी तसेच ७६ व्या जयंतीनिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आठ दिवस विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून त्याचा समारोप वृक्षारोपणाने करण्यात आला.

ताथवडे परिसरातील वन विभागाच्या क्षेत्रामध्ये शेकडो वृक्षांची रोपे लावण्यात आली तसेच बीजरोपणही करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवागार निसर्ग निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमावेळी संस्थेच्या डायरेक्टर ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात, डॉ. महेशकुमार धोंडीराम खरात, वन विभागाचे वनरक्षक सुरज इंकर, वनसेवक गजाबा जाधव तसेच संस्थेचे वॉलंटियर राजाराम अडसूळ, सुखदेव फुले, पंकज शिंदे, सनी नाळे, श्रीकांत गावडे, अशोक गावडे, वीरसेन सोनवणे आणि हिम्मतराव खरात उपस्थित होते. तसेच ताथवडे गावातील जाधव, शिंदे आणि इतर ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विषद करताना सांगितले की, वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे. अशा परिस्थितीत अधिकाधिक वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज बनली आहे. झाडांमुळे शुद्ध प्राणवायू मिळतो, पावसाचे प्रमाण संतुलित राहते तसेच जमिनीची धूप रोखण्यास मदत होते. वृक्ष हे अनेक पक्षी आणि प्राण्यांचे आश्रयस्थान असून मानवाच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत.

“एक व्यक्ती – एक झाड” हा संदेश समाजात रुजवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करणे हीच खरी काळाची गरज असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment