राज्यातील सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या निर्वाह भत्त्यात मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. सध्या मिळणाऱ्या रकमेपेक्षा सुमारे तीनपट वाढ करण्याचा विचार सुरू असून याबाबत विधानपरिषदेत माहिती देण्यात आली. त्यामुळे येत्या काळात विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे.
किती मिळणार भत्ता?
सध्या विद्यार्थ्यांना सुमारे 15 हजार रुपये निर्वाह भत्ता दिला जातो. हा भत्ता वाढवून थेट 50 हजार रुपये करण्याचा प्रस्ताव शासनाच्या पातळीवर चर्चेत आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव सादर केला असून संबंधित समितीचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी सुमारे 7.15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, काही सैनिकी शाळांकडून प्रस्ताव अजून प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी भत्ता वितरण पूर्ण झाले असले तरी इतर ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. सर्व संस्थांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
शिक्षणाचा पैसा इतर कामांसाठी वापर
याशिवाय, केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त शिष्यवृत्ती योजनांमध्ये निधी वितरणाच्या प्रक्रियेत काही अडचणी येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. सध्या निधी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केला जात असल्यामुळे काही वेळा तो शैक्षणिक उद्देशांऐवजी इतर कारणांसाठी वापरला जातो.
ही समस्या दूर करण्यासाठी निधी थेट महाविद्यालयांना देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. तसेच केंद्राकडून प्रलंबित निधी लवकर मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांना निधी उशिरा मिळाल्यास त्यांचे निकाल किंवा कागदपत्रे अडवू नयेत, असे निर्देश सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.






