राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बारामतीतील विद्यमान नगरसेवक किशोर मासाळला दणका बसला आहे. सत्तेचा गैरवापर करणं त्याला भोवलं आहे. त्याच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्यात एका 45 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून किशोर आप्पासाहेब मासाळ याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात घुसून धमकी, अश्लील मागण्या
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 फेब्रुवारी 2026 ते 25 मे 2026 या कालावधीत आरोपीने फिर्यादी महिलेशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तिच्या राहत्या घरी अनधिकृत प्रवेश केल्याचा आरोप आहे. तसेच वेळोवेळी अश्लील स्वरूपाच्या मागण्या करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यातून मासाळची लिंगपिसाट वृत्ती समोर आली आहे.
महिलेचा पाठलाग करून तिला मारहाण
फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या ओळखी व प्रभावाचा धाक दाखवत धमक्या दिल्या. तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी देत आर्थिक लाभ मिळवून देण्याची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपीने महिलेचा पाठलाग करून तिला मारहाण केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 253/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 332(c), 74, 75, 78, 115(2), 352 आणि 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेकडे वारंवार शरीरसुखाची मागणी
पतीच्या निधनानंतर एकट्या राहत असलेल्या विधवा महिलेचा गैरफायदा घेत तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करणे, घरात अनधिकृतपणे प्रवेश करून विनयभंग करणे, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणे तसेच मारहाण केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात येथील नगरसेवक किशोर आप्पासाहेब मासाळ (रा. सूर्यनगरी, जळोची, बारामती) याच्या विरोधात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. आरोपीने तिचा वारंवार पाठलाग केला तसेच हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिलेने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
बिनविरोध नगरसेवक
विशेष म्हणजे मासाळ हा येथील राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत तो बिनविरोध निवडून आला होता. त्याच्याकडून हे कृत्य केल्याने बारामतीत खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता त्याची पक्षातून हकालपट्टी होणार का? पक्षाच्या नेत्या, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे.


