भिगवण–भादलवाडी सर्व्हिस रोडवर अज्ञात ट्रकच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात अजित दगडू वाळके (वय ५४, रा. भिगवण) यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना ११ मार्च रोजी रात्री उशिरा भादलवाडी हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वाळके हे दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.
या प्रकरणी भिगवण पोलिस स्टेशन येथे अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. फरार ट्रक चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, पुणे–सोलापूर महामार्गावर तसेच सर्व्हिस रोडवर वारंवार अपघात होत असल्याने हा मार्ग दिवसेंदिवस अधिक धोकादायक ठरत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वाहतुकीचे नियम न पाळणे, भरधाव वेग आणि काही ठिकाणी अपुरी प्रकाशयोजना यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या मार्गावर तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.






