भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. भारतीय राज्यघटना ही पूर्णतः लोकशाहीवर अवलंबून आहे. लोकशाही म्हणजे, लोकांनी, लोकांचे, लोकांकरिता चालविलेले राज्य. भारतीय राज्यघटना जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या 4 मूल्यांवर आधारित आहे. भारतीय संविधानात नागरिकांना समानता, स्वातंत्र्य आणि न्याय सुनिश्चित करणारे मूलभूत हक्क मिळाले आहेत. यामुळेच गरीब असो की श्रीमंत प्रत्येकाला समान कायदा लागू होतो. भारतीय संविधानात मिळालेले 10 अधिकार कोणते जाणून घेऊया.
भारतीय संविधानात मिळालेले 10 अधिकार
1 संविधानातील अनुच्छेद 14ते 18 अंतर्गत समानतेचा हक्क मिळाला आहे. कायद्यासमोर धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यात समानता. यामुळेच कोणताही भेदभाव होत नाही.
2 संविधानामुळेच भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे. यामुळेच मत मांडता येतात. तसेच कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
3 सभा स्वातंत्र्य संविधाअंतर्गत शांततेने आणि शस्त्रांशिवाय एकत्र येण्याचा अधिकार मिळाला आहे.
4 संघटन स्वातंत्र्याटा अधिकार संविधानात मिळाला आहे. संघटना, संघ किंवा सहकारी संस्था स्थापन करता येवू शकते.
5 संविधानात भारताच्या संपूर्ण प्रदेशात मुक्तपणे फिरण्याचा अधिकार मिळाला.
6 संविधानात जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला आहे. जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण मिळते.
7 संविधानात शिक्षणाचा हक्क मिळाला आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळाले आहे.
8 शोषणापासून संरक्षण मिळण्याचा अधिकार संविधानात मिळाला आहे. मानवी तस्करी, सक्तीचे श्रम आणि बालमजुरीवर बंदी घालण्यात आली आहे.
9 संविधानात धर्म स्वातंत्र्य मिळाले आहे. सद्सद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य, आणि धर्माचे पालन करण्याचा, धर्माचा स्वीकार करण्याचा आणि धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार आहे.
10 घटनात्मक उपायांचा अधिकार संविधानात मिळाला. मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार संविधानामुळे मिळाला आहे.



