भिगवण उपबाजार कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात गंभीर अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दररोज शेकडो शेतकरी, व्यापारी व ग्राहकांची वर्दळ असणाऱ्या या उपबाजारात मूलभूत स्वच्छतेच्या सुविधाच कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे रविवारी आठवडे बाजारासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरीवर्ग येथे येत असतो, त्यामुळे या अस्वच्छतेचा त्रास अधिकच तीव्रतेने जाणवत आहे.
विशेषतः सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. शौचालयांमध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढिग, प्लास्टिकच्या बाटल्या, साचलेली घाण, तुटलेले दरवाजे आणि अस्वच्छ भिंती दिसून येत आहेत. काही ठिकाणी पाण्याचीही व्यवस्था नसल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. दुर्गंधीमुळे परिसरात उभे राहणेही कठीण होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेचे मोठे दावे केले जात असताना प्रत्यक्षात मात्र भिगवण उपबाजारातील परिस्थिती या दाव्यांना छेद देणारी आहे. प्रशासनाकडून नियमित साफसफाई, देखभाल आणि देखरेख न झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे.
व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, बाजारात येणाऱ्या ग्राहकांवर या अस्वच्छतेचा नकारात्मक परिणाम होत असून बाजाराच्या प्रतिमेलाही धक्का बसत आहे. शेतकऱ्यांनाही या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक, व्यापारी व शेतकरी यांच्याकडून प्रशासनाला तातडीने जाग येण्याची मागणी करण्यात येत आहे. शौचालयांची त्वरित दुरुस्ती, नियमित साफसफाईसाठी कर्मचारी नेमणूक, स्वच्छ पाणी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी होत आहे.






