---Advertisement---

बारामतीत लाखो खर्चून बसवलेले सिग्नल बंदच; नागरिकांचा संताप

April 2, 2026 6:16 PM
---Advertisement---

बारामती शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील विविध चौकांमध्ये लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेली सिग्नल यंत्रणा अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. वापरात नसलेले हे सिग्नल आता केवळ उभे असलेले खांब बनून राहिल्याचे चित्र दिसत आहे.

भिगवण चौक, इंदापूर चौक, शिवाजी चौक, गुणवडी चौक आणि MIDC परिसरातील पेन्सिल चौक हे शहरातील अतिशय वर्दळीचे भाग आहेत. याठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिग्नल बसवण्यात आले होते. मात्र ते सुरू न झाल्याने या चौकांमध्ये सतत कोंडीची परिस्थिती निर्माण होत असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या सिग्नलसाठी तसेच त्यांच्या देखभालीसाठी मोठा निधी खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. तरीही नागरिकांना त्याचा कोणताही फायदा होत नसल्याने “हा पैसा नेमका कुठे गेला?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. सिग्नल बंद राहण्यामागे तांत्रिक अडचणी आहेत की नियोजनाचा अभाव, याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने नाराजी अधिकच वाढली आहे.

बारामतीत हेल्मेट बंधनकारक; अपघात रोखण्यासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल

याचबरोबर या चौकांमधून जड वाहनांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. सिग्नल कार्यरत नसल्याने वाहतुकीत समन्वय राहत नाही आणि त्यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक व्यापारी व रहिवाशांच्या मते, सिग्नल सुरू झाल्यास वाहतुकीत शिस्त येऊ शकते.

शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना सक्षम वाहतूक व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. अशा परिस्थितीत मोठा खर्च करून उभारलेली सिग्नल यंत्रणा बंदच राहणे ही गंभीर बाब असून, यासाठी जबाबदार कोण, असा सवाल नागरिक करत आहेत. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून हे सिग्नल कार्यान्वित करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

Omkar Wagh

ओंकार वाघ, महाराष्ट्र टाइम्समध्ये डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत होते. त्यांनी २०१९ पासून पत्रकारीतेला सुरुवात केली. त्यांना डिजीटल मीडियामध्ये 6 वर्षाचा अनुभव आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “बारामतीत लाखो खर्चून बसवलेले सिग्नल बंदच; नागरिकांचा संताप”

Leave a Comment