बारामती परिसरात वाढत्या दुचाकी अपघातांच्या पार्श्वभूमीवर हेल्मेट वापर सक्तीने लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 129 आणि संबंधित नियमांनुसार आता दुचाकी चालक तसेच मागे बसणाऱ्या व्यक्तींनी हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या आदेशानुसार बारामती कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळे, नगरपालिका, शाळा, महाविद्यालये तसेच खाजगी आस्थापनांमध्ये येणाऱ्या प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान करणे आवश्यक राहील. “हेल्मेट नाही, प्रवेश नाही” अशा सूचनांचे फलक प्रवेशद्वारावर लावण्याचे निर्देश देण्यात आले असून, हेल्मेट नसलेल्या व्यक्तींना प्रवेश नाकारण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांवर सोपवण्यात आली आहे. तसेच सुरक्षा रक्षकांना (Security Guards) याबाबत स्पष्ट सूचना देऊन नियमांची अंमलबजावणी कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यासोबतच, संबंधित कार्यालये व संस्थांनी आपल्या परिसरात येणाऱ्या नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापराचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः विद्यार्थी व तरुणांमध्ये हेल्मेट वापराची सवय निर्माण व्हावी, यासाठी शाळा आणि महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


प्रशासनाच्या माहितीनुसार, बारामती भागात दुचाकी अपघातांचे प्रमाण आणि त्यामधील मृत्यूदर चिंताजनक आहे. अनेक अपघातांमध्ये हेल्मेट न वापरल्यामुळे गंभीर दुखापती व मृत्यू होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू करण्यात येत असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित चालक तसेच आस्थापना प्रमुखांवरही कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेट न वापरणाऱ्यांवर दंड आकारला जाईल आणि वाहनचालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची तरतूद आहे. याशिवाय, वारंवार नियमभंग करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
बारामतीत लाखो खर्चून बसवलेले सिग्नल बंदच; नागरिकांचा संताप
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती यांनी सर्व आस्थापनांना या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले असून, अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित प्रमुखांनी पार पाडावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनीही स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






